अहिल्यानगर, दि.१५ एप्रिल :-
punyshlok ahilyadevi holkar jal vyavsthapan kruti arakhada 2026 अहिल्यानगर जिल्ह्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती आराखडा २०२६’ अंतर्गत कृती पंधरवड्याचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते मुख्य उद्घाटन झाले. संगमनेर, अकोले, नेवासा, पाथर्डी, शेवगावसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली.संपूर्ण जिल्ह्यात पाण्याचे महत्त्व विषद करत अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. हा कृती आराखडा मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून तो जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात सर्व शासकीय विभागांनी समन्वयातून उद्दिष्टपूर्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील सहा नद्यांचे जल असलेल्या कलशाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, कार्यकारी अभियंता प्रकाश नारायण थोरात व स्वप्नील काळे उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा स्वप्नील काळे यांनी विषद केली.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती आराखडा २०२६ संगमनेर
येथे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ झाला. बाफना सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कार्यकारी अभियंता अमोल कवडे यांनी स्वागत व प्रस्तावना केली. निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन महेश गायकवाड यांनी केले. त्यानंतर आमदार खताळ यांच्या हस्ते जलरथाचा शुभारंभ करण्यात आला. अकोले तालुक्यात आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. नेवासा येथेही आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उद्घाटन झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रताप चिंधे उपस्थित होते.
पाथर्डी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार दिग्विजय पाटील यांच्या हस्ते या आराखड्याचा शुभारंभ झाला. जलसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने पाण्याची बचत करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पाटील यांनी केले. पाणी वाचवले नाही तर भविष्यात पाण्यावरून युद्ध होईल, अशी जाणीव अधिकाऱ्यांनी करून दिली. कार्यक्रमाची रूपरेषा सहायक कार्यकारी अभियंता भूषण उबाळे यांनी स्पष्ट केली व सूत्रसंचालन उपविभागीय अधिकारी इंद्रजित यादव यांनी केले. या कार्यक्रमास शेतकरी व तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.
शेवगाव तहसील कार्यालयात कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नायब तहसीलदार अविनाश आव्हाड, कृषी अधिकारी प्रशांत टेकाळे, उपविभागीय अधिकारी संदीप शेळके व सरपंच म्हस्के उपस्थित होते. सहायक कार्यकारी अभियंता अनंत उपाध्ये यांनी प्रस्तावना केली. उपविभागीय अधिकारी श्रीहरी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याव्यतिरिक्त श्रीगोंदा, कर्जत तसेच जामखेड तालुक्यांमध्येही जलव्यवस्थापन कृती आराखड्याचा शुभारंभ करण्यात आला. सर्वच ठिकाणी जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, परिसरातील लाभधारक शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या सर्वच कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना पाण्याची बचत करण्याची जलप्रतिज्ञा देण्यात आली.