ठाणे/भिवंडी
Mahatet 2026 paper leak महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 च्या एक दिवस आधीच पेपरफुटीचा मोठा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी दिल्लीहून TET परीक्षेचे प्रश्नपत्र घेऊन भिवंडीत आले होते आणि ते सुमारे दीड कोटी रुपयांत विकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आणि तिघांना रंगेहात अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजीव शॉ (बिहार), आकाश कुमार (बिहार) आणि धीरज सिंह (हरियाणा) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या TET परीक्षेचे प्रश्नपत्राचे चार संच जप्त करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जप्त प्रश्नपत्रांची पडताळणी केली असता ती मूळ प्रश्नपत्रांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात आले होते, त्यांच्या मागे कोणते मोठे पेपरफुटी रॅकेट कार्यरत आहे, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसेच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दीड कोटींच्या या कथित व्यवहारासंबंधी आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू आहे.
या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रविवारी होणारी TET परीक्षा पुढे ढकलली असून नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे.