नाशिक
nashik neet ug paper leak case cbi arrests देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित शुभम खैरनार याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आपल्या ताब्यात घेत दिल्लीला रवाना झाले आहे. तर या मध्ये अहिल्या नगर येथील धनंजय नामक व्यक्तीचा समावेश असल्याचे कळते.
राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीनंतर आणि CBI च्या विनंतीनुसार नाशिक गुन्हे शाखा-२ च्या पथकाने ही कारवाई केली होती.
या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम खैरनार आणि अहिल्यानगर येथील तसेच सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या धनंजय नामक व्यक्तीने मिळून NEET चा पेपर लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनंजय याने हा पेपर शुभमला सुमारे १० लाख रुपयांना विकला होता. त्यानंतर शुभमने टेलिग्रामच्या माध्यमातून तोच पेपर पुढे तब्बल १५ लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असून त्याबाबतची माहिती स्वतः शुभमने चौकशीदरम्यान पोलिसांना दिल्याचे समजते. त्यामुळे या रॅकेटमध्ये मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, यापूर्वीही शुभम आणि धनंजय यांनी NEET पेपर लीक केल्याचा संशय असून त्या वेळी लीक झालेला पेपर मूळ प्रश्नपत्रिकेशी सुमारे ८० टक्के मिळताजुळता असल्याची माहितीही चौकशीतून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे या महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात शुभमचा याआधीपासून सहभाग असण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरणाचा तपास आता CBI कडून वेगाने सुरू असून पुढील चौकशीसाठी शुभम खैरनारला दिल्ली येथे नेण्यात आले आहे.