शिरूर
तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार असून लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात होणार आहे.
बैल पोळा सणानिमित्त तालुक्यात प्रथमच भव्य खुल्या राक्षसभुवन केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन बैलगाडा शर्यत कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी जवळपास दोनशे बैलगाड्यांची नोंदणी झाली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सदरील नोंदणी करण्यात येते आहे.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक्काहत्तर हजार रुपयअसून पारितोषिकाचे आयोजक माजी मंत्री सुरेश धस हे आहेत.द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार रुपयांचे असून त्याचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हे आहेत.
तृतीय पारितोषिक एकतीस हजार रुपयांचे असून त्याचे आयोजक नगरपंचायतचे नगरसेवक उद्धवराजे घोडके हे आहेत.चौथे पारितोषिक एकवीस हजार असून त्याचे आयोजक राक्षसभूवनचे सरपंच दत्ता तांबे हे आहेत पाचवे पारितोषिक पंधरा हजार रुपयांचे असून त्याचे आयोजक अशोक तांबे हे आहेत.
सहावे पारितोषिक अकरा हजार रुपयांचे असून त्याचे आयोजक युवा नेते कैलास तांबे हे आहेत.सातवे बक्षीस सात हजार रुपये असून त्याचे आयोजक झापेवाडीचे सरपंच संदीप पवार हे आहेत.सदरील शर्यत राक्षसभुवन-आनंदगाव रस्त्याच्या बाजूला असलेल्या मैदानात होणार असून बैलगाडा शर्यत प्रेमींनी या शर्यतीचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन राक्षसभुवन बैलगाडा शर्यत कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.