तिसगाव
गणपतीच्या आगमनानंतर महालक्ष्मीचे आगमन होत असते. या महालक्ष्मी समोर वेगवेगळ्या प्रकारची आरस मांडण्याची प्रथा अहमदनगर जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यातील तिसगाव येथील गणेश शंकर उंडाळे यांनी चक्क आपल्या महालक्ष्मी ट्रॅक्टर वर बसवल्या आहेत.
या महालक्ष्मींना बघण्यासाठी तिसगावकरांनी गर्दी केली. आता तुम्ही म्हणाल की या महालक्ष्मी ट्रॅक्टर वर बसल्या कसे आणि ट्रॅक्टर घरात आणला कसा?
त्यासाठी गणेश गुंडाळे यांना मोठी कसरत करावी लागली.
याबद्दल गणेश उंडाळे यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने महालक्ष्मी बसवतो. गेल्या काही वर्षापासून अनोख्या पद्धतीने महालक्ष्मी बसवाव्यात अशी संकल्पना डोक्यात आली त्यानंतर आम्ही सुरुवातीला झोक्यावर महालक्ष्मी बसवल्या. मागील वर्षी टू व्हीलर वर म्हणजेच स्कुटीवर महालक्ष्मी बसवल्या होत्या.
आमच्याकडे एक महालक्ष्मी आणि त्यांची दोन पीलवंड असे बसवण्याची प्रथा आहे. मग ही संकल्पना साकार करण्यासाठी आमच्याच घरी असलेला ट्रॅक्टर घरात घालण्याचे ठरवले. त्यासाठी गावातील मोठा क्रेन आणण्यात आला. या क्रेनच्या साह्याने कंपाउंड वरून हा ट्रॅक्टर उचलून हळूच घराच्या दरवाजातून आत मध्ये आणण्यात आला.
शेती काम करण्यासाठी वापरण्यात येत असलेला छोटा ट्रॅक्टर गणेश उंडाळे यांनी आपल्या घरात आणला आणि त्यावर महालक्ष्मीचे आगमन झाले.
याबाबत अधिक माहिती देताना रूपाली उंडाळे म्हणाल्या की, महिलांना सक्षम करण्याचे धोरण सध्या सरकार करत आहे, आणि महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये काम करत असतात. या सक्षमतेचे प्रतिक म्हणून आम्ही यंदा या महालक्ष्मी ट्रॅक्टर वर बसवलेल्या आहेत.
उंडाळे कुटुंबीयांनी बसविलेल्या या अनोख्या गौरीची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.