करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण
अहिल्यानगर –
Karveer Chhatrapati Fourth Shivaji Literary Awards समाजाचे स्पंदन टिपण्याचे काम कवि आणि लेखक करतात. आपल्या लेखणीने जीवनाचा धांडोळा घेत असताना चौकटीपलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता निर्माण करत आहे. या पिढीचे लेखक बंधन पाळत नसून, चौकटी बाहेर पडून आपले विचार व्यक्त करत आहे.
आजचे लेखक, कवी हे फक्त मराठीचे प्राध्यापक नसून, विविध क्षेत्रातील आहे. वैचारिक मानदंड व विचार आज समाजापर्यंत साहित्यिक घेऊन जात आहे. मराठी साहित्य वेगळ्या वळणावर असून, यामध्ये काल्पनिक विश्व रंगविले जात नसून, संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब यामध्ये उमटत असल्याचे प्रतिपादन 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने आयोजित छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी डॉ. शोभणे बोलत होते.
प्रारंभी हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अहिल्यानगर शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव आणि सभापती ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे पुरस्कार समितीचे कार्यकारी राज्य समन्वयक प्रा. गणेश भगत आदींसह संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शोभणे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे साहित्यिक पुढे घेऊन जात आहे. जेव्हा लेखक सुस्थितीत येतो, तेव्हा त्यांच्यातील खरा लेखक संपलेला असतो. संघर्षशील जीवनातील त्यांनी केलेले लेखन उत्कृष्ट ठरते. वाचक हरवला नसून, त्यांना सशक्त आणि नवनवीन पाहिजे असते. लेखकांनी परिश्रम घेण्याची वृत्ती ठेवावी. भरभर पुस्तके येतात, त्यामुळे ती वाचली जात नाही.
लेखकांपेक्षा वाचक अधिक सजग झाले आहेत. आपले सत्व लेखणीत उतरवा, त्या साहित्यावर वाचकांच्या उड्या पडल्याशिवाय राहणार नाही. कसदार लेखनाने चांगली पिढी घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य क्षेत्रातील पुरस्काराचे त्यांनी विशेष कौतुक केले.
प्रास्ताविकात ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी सृजनशील समाज निर्मिती व्हावी आणि साहित्यिकांची मोट बांधण्याच्या दृष्टीकोनाने दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. साहित्यिक चळवळीतून समाजाला दिशा देण्यासाठीचा संस्थेचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्था गीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
मानपत्राचे वाचन प्रा. गणेश भगत यांनी केले. यावेळी पुरस्कार निवड समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षक डॉ. बापू चंदनशिवे यांनी 152 पुस्तक परीक्षणातून पुरस्कारांची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले.
पुरस्कार्थी कवी गितेश शिंदे यांनी शाही सन्मान झाल्याची भावना व्यक्त केली. डॉ. महावीर अक्कोळे व दिपाली दातार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देवा झिंजाड यांनी एक भाकर तीन चुली, या कादंबरीवर ग्रामीण भागातील आईच्या संघर्षमय जीवनातील काव्य सादर करताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
डॉ. जोतीराम कृष्णराव पवार यांनी आजचे वैचारिक प्रदूषण थांबविण्यासाठी लेखकांना समर्थपणे भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यांच्या लेखणीतून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पुन्हा रुजवावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रामचंद्र दरे म्हणाले की, आजचे लेखक, कवी सामाजिक भान जपून शाहू महाराजांचा वैचारिक वारसा पुढे चालवत आहे. अनेक ज्येष्ठ साहित्यिक, कवी या मातीतून घडले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2024 पुढीलप्रमाणे:-
ठाणे येथील गितेश गजानन शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्द छायेत (कविता संग्रह), जयसिंगपूर येथील डॉ. महावीर रायाप्पा अक्कोळे यांच्या संतांचा तो संग नव्हे भलतैसा (धार्मिक, संत साहित्य), पुणे येथील देवा गोपीनाथ झिंजाड यांच्या एक भाकर तीन चुली (कादंबरी) तसेच पुणे येथील दिपाली मुकुंद दातार यांच्या पैस प्रतिभेचा (वैचारिक), सांगली येथील महादेव तुकाराम माने यांच्या वसप (कथा संग्रह) या साहित्य कृतींना राज्य साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर येथील प्राचार्य. डॉ. जोतीराम कृष्णराव पवार यांच्या राजर्षी शाहूंची वाडम:यीन स्मारके (संपादित, ऐतिहासिक ग्रंथ) या साहित्यकृतीला विशेष राज्य साहित्य पुरस्कार, त्याचबरोबर जिल्हास्तरावरील जिल्हा साहित्य पुरस्कार श्रीकांत नारायण लगड यांच्या उमंग (चरित्र) या ग्रंथास देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, 10 हजार रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ पुरस्काराचे स्वरुप होते. तर संस्थेतील लेखक, साहित्यिक डॉ. रामदास टेकाळे यांचा साहित्य गौरवाने सन्मान करण्यात आला.