शिर्डी, दि. ११ :-
ahilyanagar umed abhiyan shrirampur विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नारीशक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बचत गटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग सातत्याने वाढत असून, बचतगट व ‘उमेद’ अभियानाला शासनाचे भक्कम पाठबळ आहे. येणाऱ्या काळात उमेद अभियानाचा प्लॅटफॉर्म महिलांना नव्या संधी उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर तालुका पंचायत समिती व कृषी विभागाच्या वतीने महिला बचत गटांना अनुदान वाटप तसेच विविध साहित्याचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागातील बचत गटांच्या चळवळीशी जोडलेल्या महिला आता स्वतःच्या हिमतीवर यशस्वी उद्योजक बनत आहेत. या चळवळीने नारीशक्तीला संघटित करण्याचे मोठे काम केले आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्तीच्या सन्मानासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, त्याचा सकारात्मक परिणाम बचत गटांच्या चळवळीवर दिसून येत आहे.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उमेद अभियानाला मोठे पाठबळ मिळत आहे. राज्य सरकारने आतापर्यंत बचत गटांच्या चळवळीला ४८ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. या कर्जाच्या परतफेडीची शाश्वती असल्यामुळे सरकारचा या चळवळीवर अधिक विश्वास वाढला आहे. भविष्यात बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठेत मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची एक हजार उत्पादने ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली आहेत. वाढती स्पर्धा लक्षात घेता, उत्पादनाच्या आकर्षक पॅकेजिंगबरोबरच मार्केटिंगमध्येही व्यावसायिकता स्वीकारावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा स्तरावर ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच तालुकास्तरीय उमेद मॉलची संकल्पनाही प्रत्यक्षात आणली जाणार असून, तालुकास्तरीय पहिला उमेद मॉल श्रीरामपूर येथे उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘लखपती दीदी’ निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, लाडक्या बहिणींच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. तसेच, अहिल्यानगरमध्ये एकल महिलांसाठी सुरू झालेली चळवळ अधिक व्यापक करून या महिलांनाही कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रकल्प संचालक मंजुषा ठवरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, संजय फंड, दीपक पठारे, नानासाहेब पवार, शरदराव नवले, बाबासाहेब चिडे, जितेंद्र छाजेड, श्रीनिवास बिहाणी, गिरीधर आसणे, गटनेत्या वैशाली चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.